Ad will apear here
Next
‘चांगल्या साहित्याला वाचकवर्ग आहे’
पुणे : ‘वाचन जागर अभियानासारख्या उपक्रमांची सध्या गरज आहे. सोशल मीडियामुळे वाचन आणि लेखनावर परिणाम झाला असला तरी चांगल्या साहित्यासाठी वाचकवर्ग आजही आहे. सध्या ई-बुक, किंडल अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून वाचन शक्य आहे. त्या माध्यमांचा वापर करून का होईना, लोकांनी दर्जेदार वाचावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली.

लेखक, प्रकाशक आणि पुस्तकांचे विक्रेते यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचन जागर अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वाचन जागर महोत्सवाचे पुण्यात शनिवारी, सायंकाळी सहा वाजता शहरातील आठ ठिकाणी एकाच वेळी उद्घाटन झाले. अप्पा बळवंत चौकातील रसिक साहित्य या पुस्तक दालनात महोत्सवाचे उद्घाटन गोडबोले यांच्यासह माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर व ‘रसिक साहित्य’चे योगेश नांदुरकर यांच्या उपस्थितीत झाले. विद्येच्या माहेरघरातील सर्व प्रकारच्या नव्या जुन्या पुस्तकांची मांदियाळी असलेल्या अप्पा बळवंत चौकात या उपक्रमानिमित्त पुन्हा एकदा पुस्तकांचे, लेखकांचे, प्रकाशकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

‘रसिक साहित्य’मधील वाचन जागर अभियानाच्या खास दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थितांपैकी अनेकांनी पुस्तके खरेदी करून त्यावर लेखकांच्या सह्या घेतल्या. अनेकांनी येऊन लेखकांशी गप्पा मारल्या. वाचन संस्कृती, सध्या पुस्तकांमधून हाताळले जाणारे विषय, सोशल मीडियावर तयार होणारा आशय, इंग्रजी साहित्य, शिक्षणाचे माध्यम आणि त्याचा वाचनावर होणारा परिणाम अशा अनेक अंगांनी गोडबोले व देशमुख यांनी आपले अनुभव व मते मांडली.

वाचनाची मानसिकता रुजण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची, लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांच्या संवादाची गरज असल्याचा निष्कर्ष चर्चेअंती निघाला. ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना गोडबोले यांनी सांगितले, ‘अशा प्रकारच्या उपक्रमांची सध्या गरज आहे. सोशल मीडियामुळे वाचन आणि लेखनावर परिणाम झाला असला तरी चांगल्या साहित्यासाठी आजही वाचकवर्ग आहे. सध्या ई-बुक, किंडल अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून वाचन शक्य आहे. त्या माध्यमांचा वापर करून का होईना, लोकांनी दर्जेदार वाचावे. सोशल मीडियावर उथळ आशय किंवा साहित्य मोठ्या प्रमाणात येत असले, तरी काही प्रमाणात सीरीयस आशयही या माध्यमांवर येतो. नवोदित लेखकांना आपले साहित्य प्रसिद्ध करण्याची संधी यामुळे मिळत आहे. तंत्रज्ञानामुळे साहित्याची पोहोच वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामुळे साहित्याचा दर्जा खालावत आहे ही ओरड चुकीची आहे.’

माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचन जागर अभियानाची स्तुती केली. ‘माणसाला माणूस बनवण्यासाठी ललित साहित्य वाचले गेले पाहिजे. ललित वाचणारा माणूस कधीच अतिरेकी बनत नाही. वेगवेगळ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू ललित लेखनाच्या माध्यमातून उलगडले जातात. त्यामुळे माणूस इतरांचा विचार करतो,’ असे ते म्हणाले. छापील पुस्तकाला मरण नसून, प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याचा अनुभव खास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ललित लेखनाविषयी बोलताना गोडबोले म्हणाले ‘सध्या ललित साहित्य कमी होत चालले आहे. कावितांचे पुस्तक छापायला आज कोणीही प्रकाशक तयार नसतो. चांगल्या दर्जाचे ललित साहित्य नष्ट होत आहे. सध्याच्या काळात नवे ललित साहित्य मोठ्या प्रमाणावर तयार होत नाही. आजही आपण जुनेच ललित साहित्य वाचत आहोत.’
‘वाचनात वाढ व्हावी, वाचन हा ‘स्टेटस सिम्बॉल बनावा’ आणि तरुणांनी अधिकाधिक ओढीने पुस्तके वाचावीत, यासाठी समाजमाध्यमांवर, यू-ट्यूबसारख्या माध्यमांवरून प्रकाशकांनी तरुणांपर्यंत पोहचावे,’ असेही मत या दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केले.

‘तरुणांना सर्व गोष्टी ‘गुगल’सारख्या ठिकाणी एका सर्चवर मिळतात. परंतु त्यातून मिळणारे ज्ञान वरवरचे असते. पुस्तकांमध्ये असलेल्या आशयाची विश्वासार्हता कधीही जास्त असते, हे तरुणांच्या मनावर ठसवायला हवे. तसेच शाळांमध्येदेखील अवांतर वाचन होण्यासाठी एखादी परीक्षा अभ्यासक्रमाबाहेरील विषयाच्या ‘ओपन बुक टेस्ट’च्या माध्यमातून घेण्यात यावी, ज्यामुळे मुलांना वाचनाची आणि पुस्तके हाताळण्याची सवय लागेल,’ असे मत रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर यांनी मांडले.

पाच ते १५ ऑगस्ट या कालावधीत हा महोत्सव सुरू राहणार असून, सहभागी प्रकाशकांची दर्जेदार पुस्तके सहभागी पुस्तक दालनांमध्ये वाचकांना २५ टक्के सवलतीत उपलब्ध असतील. राजहंस प्रकाशन, रोहन प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, मनोविकास प्रकाशन, डायमंड पब्लिकेशन, समकालीन प्रकाशन, साधना प्रकाशन आणि ज्योत्स्ना प्रकाशन या प्रकाशकांसह बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस अक्षरधारा बुक गॅलरी, डायमंड पब्लिकेशन शो-रूम, पुस्तक पेठ, रसिक साहित्य आणि शब्दांगण ही पुस्तकविक्रीची दालने या अभियानात सहभागी झाली आहेत. याशिवाय महोत्सवाच्या कालावधीत वाचकांना या दालनांमध्ये वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधता येणार आहे. तसेच वाचनाशी निगडित विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

(वाचन जागर अभियानाच्या सर्व ठिकाणी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमांचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सविस्तर वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/yVXGCS या लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZUQBF
Similar Posts
वाचनातून समृद्धीकडे नेणारा महोत्सव विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्येचे प्रमुख साधन असलेल्या पुस्तकांशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड नुकतीच घडली. काही मराठी प्रकाशक, विक्रेते यांनी प्रथमच एकत्र येऊन वाचन जागर महोत्सव आयोजित केला होता. लेखकांशी गप्पा, २५ टक्के सवलतीसारखे उपक्रम राबवल्याने पुस्तकविक्रीत बऱ्यापैकी वाढ झाली. वाचकांना
‘अवास्तव अपेक्षेच्या रेसमध्ये धावू नका’ पुणे : ‘न संपणारी जीवघेणी स्पर्धा आणि सततची तुलना मानवाला घातक आहे. भौतिक गोष्टींबद्दलचा हव्यास आणि असमाधान यांच्यामुळे माणूस आपले मन:स्वास्थ हरवून बसला आहे. सततची स्पर्धा, अवास्तव अपेक्षा या रेसमध्ये सध्या लोक धावत आहेत पण या रेसमध्ये धावू नका. यातून काहीच सकारात्मक निर्माण होणार नाही. आहे त्या परिस्थितीला
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये तीन ऑगस्टला ‘मैत्र’चे आयोजन रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.
शिन्झेन किस जपानमधील विज्ञानकथा लेखक शिनइची होशी यांच्या कथा या अद्भुत असतात. वेगळे कथानक आणि धक्कादायक शेवट हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य. यातील निवडक कथा निस्सीम बेडेकर यांनी ‘शिन्झेन किस’ या संग्रहातून मराठी वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. यात १८ कथा अगदी छोट्या तीन-चार पाणी आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language